महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यात, अणदूर आणि नळदुर्ग या दोन गावांमध्ये, एक अशी अनोखी परंपरा जिवंत आहे जी केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचेही एक अद्वितीय उदाहरण मांडते. ही परंपरा आहे श्री खंडोबा, महादेवाचा अवतार मानल्या जाणाऱ्या दैवताची, ज्यांची एकच मूर्ती दोन मंदिरांमध्ये वर्षभर विभागून ठेवली जाते.
नळदुर्ग ते अणदूर: ऐतिहासिक प्रवास
श्री खंडोबाची ही कथा नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यापासून सुरू होते, जिथे त्यांची स्वयंभू मूर्ती सापडली असे मानले जाते. नळ-राजा आणि त्यांची पत्नी दमयंती यांच्या अतूट भक्तीने प्रसन्न होऊन, श्री खंडोबा या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी नळदुर्ग किल्ल्यात बानूबाईशी दुसरा विवाह केला, अशी आख्यायिका आहे.
इतिहासात अनेक उलथापालथी झाल्या. इब्राहिम आदिलशहाने किल्ल्यातील मंदिरावर उपली बुरुज बांधला, नंतर मंदिर बोरी नदी काठी बांधण्यात आले , येथेही निजामशाहीत मंदिरात गाय कापली गेली, अशा घटनांमुळे मूर्तीचे स्थलांतर होत राहिले. अखेर, ही मूर्ती अणदूर येथे आणण्यात आली. या मंदिराला छत्रपती शाहू महाराजांनी जमीन दिली, तर अहिल्यादेवी होळकर यांनी सभामंडप बांधला. अशा प्रकारे, अणदूर हे गाव श्री खंडोबाच्या भक्तीचे प्रमुख केंद्र बनले.
देवाचा करार: एकमेव उदाहरण
अणदूरमध्ये मंदिर स्थिरावल्यानंतरही, नळदुर्गच्या लोकांनी आपला देव म्हणून दावा सोडला नाही. यातून निर्माण झालेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी दोन्ही गावांनी एक अभूतपूर्व करार केला - देवाचा करार. या करारानुसार, श्री खंडोबाची मूर्ती वर्षातील सव्वा दहा महिने अणदूरमध्ये आणि उर्वरित पावणे दोन महिने नळदुर्गच्या मैलारपूर येथे राहते. दोन्ही गावात चार किलोमीटर अंतर आहे.
यात्रा: श्रद्धेचा समुद्र
मूर्तीचे हे स्थलांतर केवळ एक औपचारिकता नसून, एक भव्य उत्सव असतो. दोन्ही गावांतून पालखीतून वाजत-गाजत मिरवणुका निघतात, ज्यात अनेक भाविक सहभागी होतात. यावेळी, दोन्ही गावांचे मानकरी एकमेकांशी लेखी करार करतात, जो 'देवाचा करार' म्हणून ओळखला जातो. असा अनोखा करार जगात कुठेही पाहायला मिळत नाही.
अणदूरची यात्रा यावर्षी २ डिसेंबर रोजी आहे , त्यानंतर मूर्ती मैलारपूरला नेली जाते. या दरम्यान दर रविवारी किमान ५० हजार भाविक येतात, तर पौष पौर्णिमेला ही संख्या ५ लाखांपर्यंत पोहोचते. यात्रेत ७०० हून अधिक नंदीध्वज (काठ्या) सहभागी होतात . या यात्रांमध्ये नंदीध्वजांचे नाच, वारूंचे बेधुंद नाच, अभिषेक, नेवेद्य इत्यादी अनेक धार्मिक विधी आणि परंपरा पाळल्या जातात.
श्रद्धा आणि ऐक्य
श्री खंडोबाची ही अनोखी परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचेही एक ज्वलंत उदाहरण आहे. दोन गावांमधील हा देवाचा करार, परस्पर आदर आणि समंजसपणाच्या भावनेला बळकटी देतो. ही परंपरा आपल्याला शिकवते की, श्रद्धा आणि भक्ती या सीमा ओलांडून एकात्मतेची भावना निर्माण करू शकतात. श्री खंडोबाची ही अनोखी परंपरा आजही जिवंत आहे आणि भाविकांच्या हृदयात श्रद्धेचा अखंड दीप तेवत आहे.
- सुनील ढेपे, सचिव , श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग
मो - ७३८७९९४४११